प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचा इशा अंबानीचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. एका परिकथेप्रमाणेच या लग्नातील प्रत्येक गोष्ट जुळून आली होती. अगदी इशाच्या लग्नापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत सारं काही डोळे दिपवून टाकणारं होतं. या लग्नामध्ये क्रीडाविश्वापासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत आणि देशासह विदेशापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यातच या लग्नामध्ये बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहाला मिळालं. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या दोन्ही दिग्गज कलाकारांनी इशाच्या लग्नात चक्क जेवणाच्या पंगतीमध्ये वाढप्याची भूमिका पार पाडली. त्यांचा हा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र या दोघांनीही लग्नात पाहुणे म्हणून हजर न राहता एका वाढप्याचं काम का केलं याचा खुलासा अभिनेता अभिषेक बच्चन याने केला आहे.

इशाच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीचे फोटो आणि व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र चर्चा मात्र बिग बी आणि आमिर खान यांची झाली. पंगत वाढतांनाचे या सेलिब्रिटींचे व्हिडिओ पाहुन अनेकांनी त्यांना ट्रोलही केले. मात्र अभिषेक ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना या मागचं कारण सांगितलं असून हा लग्नातील एक विधी असल्याचं म्हटलं आहे.

गुजराती समाजातील लग्नामध्ये हा एक पारंपारिक विधी असतो. यामध्ये वधुपक्षातील लोक वरपक्षातील पाहुण्यांना स्वत: जेवण वाढतात. या विधीला ‘सज्जन घोट’ असं म्हणतात. आम्ही इशाकडून होतो. इशाला आम्ही आमच्या कुटुंबातील मुलगी मानतो आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनी पंगतीमध्ये पाहुण्यांना जेवण वाढलं.

दरम्यान, अभिषेकने दिलेल्या या उत्तरामुळे अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं दिसून येत आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अॅटीलिया येथे १२ डिसेंबर रोजी इशा अंबानी व आनंद पिरामल यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्याआधी इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची प्री-वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये पार पडली. यावेळी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय अशा सेलिब्रेटींनी यादरम्यान परफॉर्मन्स केला होता.

Story img Loader