प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात एका पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अलीने आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा दावा या पीडित गायिकेने केला असून अली जफरने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
संबंधित पाकिस्तानी गायिकेने ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. ‘मी आणखी शांत बसू शकत नाही. माझ्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल मी उघडपणे बोलली तर आपल्या समाजातील शांत बसण्याची वृत्ती संपेल असं मला वाटतं. आवाज उठवणं सोपं नसतं, पण शांत बसणं हे त्याहून कठीण असतं,’ असं तिनं म्हटलंय.

ट्विटरच्या माध्यमातून अली जफरने आरोप फेटाळत खोट्या आरोपांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ‘मी एका तरुण मुलाचा आणि मुलीचा पिता आहे, एकीचा पती आहे आणि एका आईचा मुलगा आहे. टीका, बदनामी किंवा अन्यायाविरोधात मी कुटुंबासाठी, स्वत:साठी, मित्रांसाठी किंवा सहकाऱ्यांसाठी अनेकदा खंबीरपणे उभा राहिलो आहे. त्या महिलेनं माझ्यावर जे आरोप केले त्या विरोधात इथे कुठलेही प्रतिदावे न करता कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे,’ असं अलीने ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.

अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चश्मेबहाद्दूर’, ‘टोटल सियापा’, ‘किल दिल’, ‘डिअर जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे.