करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूमुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही अभिनेता मार्क वॉलबर्गनं आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्याने पुढील सहा महिन्यांचा पगार देऊन त्यांना सुट्टीवर पाठवलं आहे.

अवश्य वाचा – तुम्हाला कोण व्हायचंय ‘इन्स्टाकर’ की ‘फेसबुककर’? अमेय वाघकडून घ्या सोशल मीडियाचे धडे

आर्थिक संकटात मार्कने कशी केली मदत?

मार्क वॉलबर्ग हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहे. इंग्लंडमध्ये त्याच्या मालकीची पाच हॉटेल्स आहेत. परंतु करोनामुळे गेले दोन महिने या हॉटेलचे दरवाजे बंद आहेत. परिणामी मार्कला दररोज लाखो रुपयांचे नुकसात होत आहे. परंतु या आर्थिक संकटातही त्याने आपल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. द सनने दिलेल्या वृत्तानुसार मार्कने पुढील सहा महिन्यांचा पगार देउन कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं आहे. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी त्याने हॉटेल व्यवसायातून बचत केलेले सर्व पैसे वापरले आहेत. शिवाय मार्कने काही कर्ज देखील घेतलं आहे. त्याने केलेल्या मदतीमुळे कर्मचारी खुश आहेत. लॉकडाउन संपताच आणखी जोमाने काम करण्याचा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला आहे.

अवश्य वाचा – “लग्न केलं ही बातमी आई-बाबांना सांगायला विसरलो”; अभिनेत्याने सांगितला तो किस्सा

मार्क वॉलबर्ग हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘द फायटर’, ‘द अदर गाईज’, ‘शूटर’, ‘डॅडिज होम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. मार्क हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु आपल्या कमाईचा मोठा वाटा तो समाजसेवी संस्थांना दान करतो.