बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अनोख्या नृत्यशैलीमुळे ९०चे दशक गाजवले होते. मिथुन चक्रवर्ती हे ‘मिथुन दा’ या नावानेही ओळखले जातात. अभिनयाबरोबरच त्यांनी गायन, लेखन, निर्मिती या क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मात्र सध्या मिथुन दा एका कारणामुळे बरेच त्रस्त आहेत.

मिथुन दा सध्या पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असून त्यांच्यावर दिल्लीमध्ये उपचार सुरु आहेत. यापूर्वीही त्यांनी लॉस एंजेलिस येथे उपचार घेतले होते. मात्र अद्यापही त्यांची या त्रासातून सुटका झालेली नाही. तसेच पाठीच्या दुखण्यामुळे गेल्या वर्षभरापासून मिथुन दा यांना चित्रपटाच्या कोणत्याही प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यामुळे नकळतपणे त्यांचे कामाकडेही दुर्लक्ष होत आहे.

‘इंडिया.कॉम’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मिथुन दा या त्रासाने प्रचंड ग्रासले आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य सभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला होता. दरम्यान, कामाकडे दुर्लक्ष नको यासाठी त्रास होत असतानादेखील त्यांनी लहान पडद्यावरील काही कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शविला होता.

२००९ साली लक चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साहसदृश्य करताना मिथुन यांच्या पाठीला दुखापत झाली होती. तेव्हापासूनच त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे.