अभिनेते नाना पाटेकर यांनी मंगळवारी बीएसएफच्या पलोडा कॅम्पला भेट दिली. यासंबंधीत एक ट्विट करत नाना म्हणाले की, ‘तुम्हा सैनिकांना शत्रूला मारायला शिकवलंय त्यामुळे तुम्हाला मरण्याचा अधिकार नाहीये.’ पलोडा कॅम्पमध्ये त्यांनी जवानांसोबत मरमुराद गप्पा मारल्या आणि आपले अनुभवही शेअर केले. भारतीय लष्कराचे जवान २४ तास देशाचे संरक्षण करत असतात. या त्यांच्या योगदानाबद्दल पाटकर यांनी त्यांना मानवंदना दिली. तसेच आपल्या बोलण्यातून त्यांनी जवानांना प्रोत्साहित केले.

जवानांच्या योगदानाबद्दल बोलताना नाना म्हणाले की, ‘बीएसएफच्या योगदानाची प्रशंसा करु तेवढी कमी. त्यांच्या कामाला विसरता येणार नाही. रात्रंदिवस सीमेवर देशाचे रक्षण करण्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.’ याआधीही नाना यांनी पलोडा येथील बीएसएफच्या कॅम्पला भेट दिली होती.

नाना यांनी कॅम्पला भेट दिल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोकांनी गर्दी करायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. लहान मुलं, महिला, जवान आणि लष्करी अधिकाऱ्यांनी पाटेकरांसोबत अनेक फोटो काढले. बीएसएफचे अधिकारी राम अवतार म्हणाले की, असे कोणी भेटायला आले की जवानांमध्ये अधिक बळ येते. भविष्यातही अशाचप्रकारचे दौरे होत राहिले पाहिजे.

नाना यांनी यावेळी बीएसएफमधील मुलांनाही आवर्जुन भेट दिली. जंगलबुक सिनेमात नाना यांनी जो आवाज दिला होता, त्यातील काही संवाद बोलून दाखवण्याचा हट्ट लहानग्यांनी धरला. त्यांचा हा हट्ट पुरवत नाना यांनी काही संवाद बोलूनही दाखवले.

दोन मुलांची जबाबदारी स्वीकारली
आपण समाजाचे काही देणे लागतो आणि आपल्यापरिने आपण सतत समाजाची मदत केली पाहिजे या सिद्धांतावर नाना चालताना दिसतात. त्यांनी दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असून, पुण्यातील त्यांच्या स्थानिक पालकत्वाची भूमिकाही स्वीकारली आहे.