शहराच्या धावपळीपासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात राहायला, शेती करायला कोणाला आवडत नाही. बॉलिवूडचे अभिनेतेसुद्धा याला अपवाद नाहीत. हौस म्हणून का असेना बऱ्याच बॉलिवूड कलाकारांकडे स्वत:ची शेतजमीन आहे आणि वेळ मिळेल तसं ते आपल्या शेतात राबतात. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीलाही शेतीची आवड असून ठाणे जिल्ह्यातील कसारा इथं तो लवकरच शेतजमीन खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईपासून जवळ शेती घ्यावी, अशी नवाजची इच्छा होती. यातही नदीकाठच्या सुपीक जमिनीच्या तो शोधात होता. कसारा इथली शेतजमीन त्याला आवडली असून लवकरच हा खरेदी व्यवहार पूर्ण होईल, असं कळतंय. नवाजुद्दीनच्या भावानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बुढाणा इथं नवाजचं घर आणि शेती आहे. पण व्यग्र वेळापत्रकामुळे नेहमीच गावी जाणं शक्य होत नसल्याने मुंबईपासून जवळ शेतजमीन घ्यावी, अशी त्याची इच्छा होती.

सध्या नवाजुद्दीन आगामी ‘मंटो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अतिसंवेदनशील आणि काही प्रमाणात वादग्रस्त विषयांवर लेखन करणाऱ्या सादत हसन मंटो यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.