हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ही संकल्पना राजेश खन्ना यांच्यापासून रुजली हे कोणीही नाकारु शकत नाही. एकामागोमाग एक सलग सुपरहिट चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या या अफलातून अभिनेत्याच्या चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांना आकर्षित करते. एकेकाळी बॉलिवडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या या नायिकाच्या एका चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘हाथी मेरे साथी’. या चित्रपटाला त्या काळात तुफान लोकप्रियता मिळाली. एवढेच नाही तर राजेश खन्ना यांनी आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली.

‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डग्गुबती मुख्य भूमिका साकारणार असून, या निमित्ताने राणा सुपरस्टार राजेश खन्ना यांना आदरांजली वाहणार आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये मुळ कथेत बरेच बदल करण्यात येणार असून, चित्रपटामध्ये वास्तविक घटनांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे समजते. तमिळ चित्रपट दिग्दर्शक प्रभू सोलोमन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणार आहे. या चित्रपटातून दर्जेदार वीएफएक्सही पाहण्यास मिळणार असून, तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Padmavati row: ‘पद्मावती’ चित्रपट कवितेवर आधारित: भन्साळी

राणाने या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात झाल्याचे ट्विट करत याविषयीची माहिती सर्वांना दिली. तर, आरजे आलोकचे याविषयीचे ट्विटही त्याने रिट्वीट केले. २०१८ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर राणाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट चित्रपटात काही साहसीदृश्येही अनुभवायला मिळणार आहेत. भारतासोबतच परदेशातही चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण केले जाणार आहे.