२००९ सालामध्ये छोट्या पडद्यावर आलेल्या ‘पवित्र रिश्ता ‘ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीने चाहत्यांची मोठी पंसती मिळवली होती. या मालिकेमुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे घराघरात पोहचले. मालिकेला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. असं असलं तरी अवघ्या २ वर्षात मानवच्या भूमिकेत झळकणाऱ्या सुशांतला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यानंतर अभिनेता हितेन तेजवानी मानवच्या भूमिकेत झळकू लागला. आता या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोक आतुरतेने वाट पाहत असलेली ‘पवित्र रिश्ता २’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोच्या सिक्वलमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेच अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अंकिताचं नाव अर्चनाच्या भूमिकेसाठी ठरल्यानंतर लोकांना उत्सुकता होती ती म्हणजे या मालिकेत मानवची भूमिका कोण साकारणार?याची. अखेर आता अर्चनाच्या नव्या मानवचं नाव समोर आलं आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, “अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार असून ७ वर्षांनंतर अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर मालिकेतील इतर भूमिकांसाठी लवकरच कास्ट ठरवण्यात येईल.” अशी शोसंबंधीत सूत्रांकडू माहिती मिळाली आहे.
View this post on Instagram
गेल्या वर्षी जुलै महिन्यात निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा सिक्वल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास एक वर्षाने मालिकेच्या कथेवर आणि स्क्रिप्टवर काम पूर्ण झालेलं आहे. ही मालिका बालाजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान अभिनेता शाहीर शेख हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. शाहीरने ‘नव्या’ या मालिकेत साकारलेली अनंत ही भूमिका तसंच महाभारत या मालिकेतील त्याच्या अर्जुनच्या भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. त्याचसोबत ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेच्या तीनही सिझनमधून शाहीरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता मानवच्या भूमिकेत शाहीरला पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असेल. असं असलं तरी अद्याप एकता कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्याकडून या वृत्ताची अधिकृत घोषणा झालेली नाही.