शाहिद कपूरला तुम्ही ‘पद्मावती’ सिनेमाच्या ट्रेलमध्ये आणि पोस्टरवर लांब केसांत आणि दाढीमध्ये पाहिले असेल. पण नुकताच तो मुंबई विमानतळावर एका वेगळ्याच लूकमध्ये दिसला. त्याने आपला चेहरा ब्लॅक स्टोलने नाकापर्यंत लपवला होता. तसेच गॉगल आणि टोपीही घातली होती. त्यामुळे त्याचा पूर्ण चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण त्याच्याकडे पाहून त्याने नवीन हेअर कट केल्याचे स्पष्ट दिसत होते.

प्रथमदर्शनी त्याला ओळखणे कठीण होते. विमानतळावरून बाहेर पडल्यापासून तो आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनी त्याला ओळखू नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले पण त्याच्या या प्रयत्नांना यश मात्र काही आले नाही.

शाहिदच्या या नव्या लूककडे पाहून तो आपल्या आगामी सिनेमाची तयारी तर करत नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शाहिदचा ‘पद्मावती’ सिनेमा येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात तो राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारताना दिसेल. आता लवकरच या सिनेमाच्या प्रमोशनलाही सुरूवात होईल. रतन सिंहच्याच लूकमध्येच शाहिदने प्रमोशन केले असते तर त्याच्या चाहत्यांना आवडले असते यात काही शंका नाही. पण शेवटी आगामी सिनेमाचाही विचार करावाच लागतो ना…

शाहिदने ‘टॉयलेट एक प्रेम’ कथा सिनेमाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंहचा आगामी सिनेमा स्वीकारला असल्याचे म्हटले जाते. पण याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा केली गेली नाहीये.