मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर मात केली असून पुन्हा एकदा ते रंगभूमीवर आपली कला सादर करण्याठी सज्ज झाले आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून शरद पोंक्षे हे कर्करोगाचा सामना करत आहेत. कर्करोगावरील उपचारानंतर ते पुन्हा एकदा नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर येणार आहेत. दरम्यान, बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात एका नाटकाच्या तालमीसाठी ते आले होते.
गेल्या डिंसेंबर महिन्यात शरद पोंक्षे यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी तब्बल सहा महिने औषधोपचार करून कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. दररोज संध्याकाळी ताप येत होता. त्यानंतर आपल्याला कर्करोगाचे निदान झाल्याचे ते म्हणाले. कंबरेखालील भागात गाठी तयार झाल्या होत्या. यादरम्यान, आपण अन्य कलाकारांच्या बातम्या वाचत होतो. तसेच सोशल मीडियावरील पोस्टही वाचत होतो. परंतु सहानुभूती नको असल्याने आपण अलिप्त राहिलो. सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांचीच मदत झाली. त्यांनी एका खोलीत ११ वर्षे काढली. परंतु मला केवळ ६ महिने काढआयचे होते. मी एक सावरकर भक्त आहे. त्याचा आपल्याला उपयोग झाला. यादरम्यान, आपण अनेक पुस्तके वाचल्याचेही ते म्हणाले.