जेव्हा एखादी मालिका सुरू होते तेव्हा त्यातील कलाकार हे त्यांचा जास्तीत जास्त वेळ सेटवरच घालवत असतात. त्यामुळेच त्यांचे सह-कलाकारांशी घरच्यांसारखेच नाते निर्माण झालेले असते. एकमेकांच्या चांगल्या- वाईट प्रसंगात ही मंडळी नातेवाईकांप्रमाणेच एकमेकांच्या मदतीला धावून जातात. त्यातही जर मालिका एक दोन नव्हे तर तब्बल १९ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असेल तर त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांमधील नाते किती घनिष्ठ असेल, याची आपण कल्पना करु शकतो.
आम्ही बोलतोय ‘सीआयडी’ मालिकेतील कलाकारांबद्दल. गेल्या १९ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने नवनवीन रेकॉर्डही केले आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘सीआयडी’ मालिकेचे निर्माते बी.पी.सिंग यांचा मोठा मुलगा सलील सिंगचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलीलने ‘सीआयडी’ मालिकेच्या काही भागांचे दिग्दर्शन केले होते तसेच त्याने काही भागांसाठी लिखाणही केले होते.
सलीलच्या निधनाची बातमी अभिनेते शिवाजी साटम यांना जेव्हा कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला. एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना साटम म्हणाले की, त्याच्यासोबत काम करताना नेहमीच चांगले वाटायचे. तो आपल्याहून ज्येष्ठ व्यक्तींशी नेहमीच अदबीने वागायचा. मला आजही तो सीआयडीच्या सेटवर जेव्हा पहिल्यांदा अॅक्शन बोलला होता तो दिवस आठवतोय. ‘सावधान इंडिया’ या मालिकेचे दिग्दर्शन करत असताना सलील सिंग यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मालिकेच्या टीमने लगेचच त्याला मीरा रोड येथील ऑर्किड रुग्णालयात नेले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते.