अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, निर्मिती, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या किशोर कुमार यांची आज जयंती. सोशल मीडियापासून ते आकाशवाणीच्या केंद्रापर्यंत आज सर्वत्रच या गायकाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते. अशा या महान गायकाविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रचंड आदरभाव आहेत यात शंका नाही. किशोर कुमार यांनी मराठी गाणी देखील गायली आहेत. हे फार कमी लोकांना माहिती आहे.
चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य गाणी गायली. हिंदी सोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली. त्यांनी गायलेल्या या तिन मराठी गाण्यांविषयी जाणून घेऊया…
मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘गंमत जंमत’ या चित्रपटाली ‘अश्विनी ये ना’ हे गाणे किशोर कुमार यांनी गायले होते. या गाण्यात अभिनेते अशोक सराफ आणि चारुशिला साबळे आहेत. अरुण पौडवाल यांनी हे गाणे कंपोज केले होते. त्यावेळी हे गाणे अक्षरश: लोकांनी डोक्यावर उचलून धरले होते. आजही हे तितकेच लोकप्रिय आहे.
‘तुझी माझी जोडी जमली’ या चित्रपटातील गाणे देखील किशोर कुमार यांनी गायले होते. अरुण पौडवाल यांनी हे गाणे कंपोज केले होते. अभिनेते अशोक सराफ हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.
किशोर कुमार यांनी ‘घोळात घोळ’ या चित्रपटातील गोरा गोरा मुखडा हे देखील गाणे गायले आहे. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांनी भूमिका साकरली होती.
आभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार यांनी अभिनयासोबतच ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘ओ हंसीनी मेरी हंसीनी’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशी कितीतरी हिंदी सुपरहिट गाणी गात रसिकांच्या मनावर राज्य केले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.