ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांना कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. अंगदुखीच्या त्रासामुळे त्यांना मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टॉम यांचा मुलगा जॅमी अल्टर याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना टॉम यांना हाडांचा कर्करोग झाल्याची माहिती दिली. ‘याबद्दल बोलण्याची ही योग्य वेळ नाही,’ असे म्हणत त्याने टॉम यांच्या आरोग्याविषयी अधिक माहिती देण्याचे टाळले. अल्टर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना गंभीर आजार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र, या सर्व चर्चा खोट्या असल्याचे नाटककार सय्यद आलम यांनी स्पष्ट केले. आलम यांनी बऱ्याच नाटकांमध्ये टॉम यांच्यासोबत काम केले.
अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘चरस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरो’ आणि ‘वीर झारा’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. मात्र ‘जबान संभालके’ (1993-1997) या शो (सिटकॉम) नंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
वाचा : म्युझिक कंपन्यांच्या एकाधिकारशाहीवर भडकले ऋषी कपूर
अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. तर १९८० ते १९९० या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिताही केली. त्यादरम्यान क्रिकेट विश्वात पाऊल ठेवण्यास सज्ज असणाऱ्या सचिन तेंडुलकरची टीव्हीवर मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते. कला आणि चित्रपट विश्वात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी २००८ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला होता.