हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये नायिकांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

गेल्या एक-दोन वर्षांत बॉलिवूडचे मोठमोठे हिरो तिकीटबारीवर मार खात असताना नायिकाप्रधान चित्रपटांना मात्र प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे सातत्याने नायिकांभोवती फिरणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढू लागली आहे. याही वर्षी सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, अनुष्का शर्मा, सोनम कपूर यांनी स्त्रियांभोवती फिरणाऱ्या चित्रपटांना उचलून धरले आहे. योगायोगाने या सरत्या वर्षांपासून पुढच्या वर्षांपर्यंत केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही नायिकांचेच ‘हिरो’पट पाहायला मिळणार आहेत.

[jwplayer zVOMyVTv]

या वर्षांची सुरुवात हिंदी चित्रपटांसाठी सोनम कपूरच्या ‘नीरजा’पासून झाली. या चित्रपटाने तिकीटबारीवरही चांगली कमाई केली आणि सोनमलाही समीक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजित’, रितिका सिंग या नवोदित अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेला ‘साला खडूस’, सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला ‘अकिरा’ असे नायिकाप्रधान चित्रपट प्रदर्शित झाले. ‘अकिरा’मध्ये तर सोनाक्षी सिन्हा पूर्णपणे अ‍ॅक्शन हिरो म्हणून स्टंट करताना दिसली. छोटय़ा बजेटचा पण तीन अत्याधुनिक मुलींची कथा सांगणाऱ्या ‘पिंक’लाही जगभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे एरव्ही ज्या हॉलीवूडमध्येही नायकांचेच वर्चस्व असते तिथेही ‘घोस्टबस्टर्स’, ‘सुसाइड स्क्वॉड’सारख्या चित्रपटांमधून नायकांची हकालपट्टी झाली आहे. तिथेही हॉलीवूड अभिनेत्रींची गँग या चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर झळकते आहे. मीरा नायर यांचा ‘क्वीन ऑफ काट्वे’ हाही पूर्णपणे नायिकाप्रधान चित्रपट होता.

हॉलिवूडमध्ये ‘रोग वन : अ स्टार वॉर्स स्टोरी’ या ‘स्टार वॉर्स’ चित्रपटमालिकेत एका वेगळ्या क थेत हॉलीवूड अभिनेत्री फेलिसिटी जोन्स महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अ‍ॅमेझॉनमध्ये राज्य केलेल्या प्रिन्सेस डायनाची कथा सांगणारा ‘वंडर वुमन’ हाही एक वेगळा हॉलीवूडपट ठरणार असून इस्रायली अभिनेत्री गॅल गॅडोत या महत्त्वाकांक्षी राजकुमारीची व्यक्तिरेखा रंगवताना दिसणार आहे. या नायिकांनी अ‍ॅनिमेशनपटांनाही सोडलेले नाही. डिस्नेचा बहुचर्चित ‘मोआना’ हा थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटही मोआना या साहसी तरुणीची कथा रंगवणार आहे. एवढय़ा सगळ्या चित्रपटांमुळे बॉलिवूड-हॉलिवूड जिथे नजर टाकाल तिथे याच नायिका तिकीटबारीवरचा खेळ खेळणार आहेत.

* बॉलिवूडमध्ये रुपेरी पडद्यावर ‘हिरो’ म्हणून चित्रपट हिट करून दाखवण्याचे श्रेय पहिले विद्या बालनकडे जाते. तिच्या त्याच ‘कहानी’ या चित्रपटाचा सिक्वल डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे.

* २०१० साली कॉमनवेल्थ खेळांमध्ये पहिली महिला पैलवान म्हणून सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या गीता फोगट आणि रजतपदक मिळवणारी तिची बहीण बबिता कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ वर्षांखेरीस पाहायला मिळणार आहे.

* पाकिस्तानी लेखिका सबा इम्तियाज यांच्या ‘कराची! यू आर किलिंग मी’ या कादंबरीवर आधारित ‘नूर’ या चित्रपटात सोनाक्षी पाकिस्तानी लेखिका-पत्रकार नूरच्या भूमिकेत दिसणार आहे.

* कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्यावर आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर हसिनाची भूमिका साकारणार आहे.

[jwplayer y8Pn2zMM]