प्रत्येक दिवशी सेलिब्रिटींच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा पाहायला मिळतात. क्रिकेट आणि कलाविश्वासाठी ही बाब नवीन नाही. अशा या वातावरणात काही दिवसांपासून अभिनेत्री एली अवराम आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांची नावं चर्चेत आहेत. त्यांच्या ‘सिक्रेट डेटिंग’विषयीसुद्धा बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. सध्याही ही बहुचर्चित जोडी एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ज्याप्रमाणे एका जाहिरातीतून ‘विरुष्का’ झळकले होते, त्याचप्रमाणे एली आणि हार्दिक प्रेक्षकांसमोर येणार का, हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करत आहे.

मुंबईतील फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी हार्दिक एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी पोहोचला तेथेच एलीसुद्धा उपस्थित होती. पण, त्यांनी एकत्रितपणे चित्रीकरण केलच नाही. तेव्हा आता ही जाहिरात नेमकी कशी असणार आहे, हे तर गुलदस्त्यातच आहे. इतकच नव्हे, तर असंही म्हटलं जात आहे की, एलीचा या जाहिरातीशी थेट संबंध नसून ती फक्त हार्दिकसाठीच येथे आली होती.

हार्दिक या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान बाइकर लूकमध्ये दिसत होता. हा लूक त्याच्यावर अगदी चांगल्या पद्धतीने शोभून दिसत होता हेसुद्धा तितकच खरं. नेहमीच आपल्या लूकसोबत नवनवीन प्रयोग करणाऱ्या हार्दिकचा हा लूक येत्या काळात तरुणाईमध्येही चर्चेत येईल असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : …म्हणून आईच्या निधनानंतर ३ वर्षांनी संजय दत्तच्या भावनांचा बांध फुटला

जाहिरात असो किंवा इतर कोणतं कारण एलीची उपस्थिती बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली हे खरं. हार्दिक पांड्याच्या भावाच्या लग्नातही एलीने हजेरी लावली होती. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगचं वृत्त समोर आलं होतं. पण, एका मुलाखतीदरम्यान, एलीने हार्दिकसोबतच्या नात्याविषयी बोलणं टाळलं होतं.