काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर ‘तुला पाहते रे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. विक्रम सरंजामे आणि इशा यांची अनोखी प्रेमकथा सर्वांनाच आवडू लागली आहे. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर विक्रमची भूमिका सुबोध भावे साकारत आहे. विशेष म्हणजे ज्या गायत्रीला लहानपणी सुबोधच्या हस्ते पुरस्कार मिळाला, तीच आता त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सुबोधने स्वत: इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गोष्ट सांगितली.
‘दुनिया गोल हैं, काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की मला पण तुमच्या बरोबर काम करायचं आहे. मी म्हणालो नक्की आणि अचानक एके दिवशी तुला पाहते रे मालिकेच्या सेटवर तिची गाठ पडली. तिने मला या प्रसंगाची आठवण करून दिली. मी थक्क! ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती ‘इशा’ म्हणजेच गायत्री दातार. स्वप्नांवरचा माझा विश्वास अजूनच वाढला,’ असं सुबोधने त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
https://www.instagram.com/p/BnXsCQohDAO/
‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा व्यावसायिक. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर. जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कसं रुपातंर होते, हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.