हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिमुकलीचं आगमन झालं. आई झाल्यानंतर नेहा आता पुन्हा एकदा तिच्या करिअरमध्ये सक्रीय झाली आहे. घर, आरोग्य आणि करिअर अशा तिन्ही गोष्टी ती सध्या उत्तमरित्या सांभाळत आहे. नेहा तिच्या बेधडक मतांसाठी आणि वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. तिच्या स्थूलपणावरून बातमी करणाऱ्या एका वेब पोर्टलला नेहाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर त्या वेब पोर्टलच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत नेहाने खडेबोल सुनावले. ‘मी कोणत्याही उत्तरासाठी बांधिल नाही कारण अशाप्रकारच्या कमेंट्समुळे मला काही फरक पडत नाही. पण एक मोठा मुद्दा म्हणून मला हा मांडायचा आहे. कारण फॅट शेमिंग हे फक्त सेलिब्रिटींसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठीही थांबलं पाहिजे. एक आई म्हणून मला माझ्या मुलीसाठी निरोगी, तंदुरुस्त आणि उत्साही राहायची इच्छा आहे. त्यासाठी मी दररोज व्यायाम करते. कधी कधी दिवसातून दोनदा करते. फिटनेस माझी प्राथमिकता आहे पण चांगलं दिसण्यासाठी किंवा समाजासमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नाही. भविष्यात अशा प्रकारे कमेंट्स करण्यापूर्वी लोकं एकदा विचार करतील अशी आशा आहे,’ असं नेहाने त्या पोस्टमध्ये लिहिलं. वरुण धवन, निम्रत कौर यांसारख्या कलाकारांनी नेहाचं समर्थन केलं आहे.

वाचा : लवकरच येतेय ‘फिर से ट्रिपलिंग’

गेल्या वर्षी नेहा आणि अंगद बेदी यांनी अचानक लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता. लग्नापूर्वी गरोदर असल्याचंही नेहा आणि अंगदने मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.