‘बेवॉच’नंतर आता प्रियांका चोप्राने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढलाय. आपल्या टीमसोबत प्रियांका प्रागमध्ये सुट्टीची मज्जा घेतेय. सुट्टीचा आनंद घेतानाचे असेच काही सुरेख फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. दरम्यान, काही दिवस भारतात आल्यानंतर ती पुन्हा आगामी चित्रीकरणासाठी परदेशी गेली आहे. लवकरच ती ‘क्वांटिको’च्या तिसऱ्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. त्याचबरोबर आणखी दोन हॉलिवूड चित्रपटांमध्येही ती काम करण्याची असल्याचे म्हटलं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या कामकाजात व्यस्त होण्यापूर्वी सुट्टीची मजा घेण्याचे तिने ठरविले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये डिझायनर तान्या टेलरच्या कपड्यांमध्ये प्रियांका अत्यंत सुंदर दिसत आहे. प्रागमधील सुप्रसिद्ध चार्ल्स ब्रिजवरील तिचा हा फोटो चाहत्यांना तोंडात बोट घालायला लावणार हे नक्की. आपल्या टीमसोबत डीनर करतानाचाही फोटो प्रियांकाने यावेळी शेअर केला आहे.
बी- टाऊनची ही देसी गर्ल सध्या बॉलिवूडमधील सर्वांत व्यस्त अभिनेत्री मानली जातेय. तिच्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटानंतर येत्या काळात ती आणखी दोन हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. ‘अ किड लाईक जेक’ आणि ‘इसन्ट इट रोमॅन्टिक’ अशी या दोन चित्रपटांची नावे असल्याचं म्हटलं जात आहे.
PHOTO : ‘बादशाहो’मधील इम्रान हाश्मीचा कधी न पाहिलेला लूक
‘जय गंगाजल’ चित्रपटानंतर प्रियांका कोणत्याही बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली नाही. ती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा होती. याआधी तिने २०१५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाईची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच सध्या ‘पीसी’ निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या चित्रपट निर्मिती संस्थेअंतर्गत प्रियांका तिच्या आईसोबत म्हणजेच मधु चोप्रा यांच्यासोबत चित्रपटांची निर्मिती करते.