देशभरात #MeToo मोहिमेचा जोर कायम आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज कलाविश्वातील कोणी ना कोणी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. ही यादी दिवसेंदिवस वाढत चालली असून यात अनेक मोठमोठी नावं समोर येत आहेत. अशातच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीसुद्धा त्यांना आलेला #MeToo अनुभव सांगितला आहे. त्या प्रसंगाला मीसुद्धा बळी पडले आहे, असं एका मुलाखतीत रेणुका म्हणाल्या.

‘प्रत्येक महिला अशा घटनेला एकदा तरी बळी पडली असणार. अशी कोणतीही स्त्री नाही जिला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसणार. माझ्यासोबतही एकाने गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेला बरीच वर्षे झाली पण ती गोष्ट मी अजूनही विसरले नाही. त्यातून सावरायला मलासुद्धा फार काळ लागला. खूप त्रासही सहन करावा लागला होता,’ असं त्यांनी सांगितलं.

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरू झाल्यानंतर रेणुका यांनी सोशल मीडियावर पीडित महिलांना पाठिंबा देण्यासाठी बरेच पोस्ट लिहिले. अभिनेत्री तनुश्री दत्तालाही रेणुका यांनी पाठिंबा दर्शविला. कलाविश्वातील या आरोपांची दखल घेत सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सिंटा) एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत अभिनेत्री रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.

Story img Loader