प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ हा मराठी चित्रपट येत्या १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘हंपी’च्या निमित्ताने प्राजक्ता आणि सोनालीने लोकसत्ता लाईव्ह चॅटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी सोशल मीडियावर बराच काळ ट्रेण्डमध्ये असलेल्या ‘मी टू’ #MeToo या हॅशटॅगवर आणि चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणावर या दोघींनी आपले मत व्यक्त केले.

हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनवर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ‘मी टू’ #MeToo या हॅशटॅगसह जगभरातील महिलांनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवांविषयी मोकळेपणाने मत व्यक्त केले होते. मराठी चित्रपटसृष्टीत असे काही प्रकार घडतात का किंवा तुम्ही कधी अशा परिस्थितीला सामोरे गेले आहात का, असा प्रश्न प्राजक्ता आणि सोनालीला विचारण्यात आलेला. यावर सुदैवाने मराठी इंडस्ट्री खूप चांगली आणि सुरक्षित आहे, कारण मराठी माणसांनी त्यांची तत्त्वं सोडली नाहीत अशी प्रतिक्रिया प्राजक्ताने दिली. ‘त्याचप्रमाणे महिलांनी सशक्त असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर कोणाला असे अनुभव येत असतील तर त्या महिलेने गप्प बसू नये, सर्वांसमोर येऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे,’ असंही तिने म्हटलं.

PHOTO : मुलाच्या वाढदिवसासाठी एकत्र आले अरबाज- मलायका

प्राजक्ताच्या वक्तव्याला सहमती दर्शवत सोनाली कुलकर्णीनेही मराठी चित्रपटसृष्टीत लैंगिक शोषणाच्या घटना घडत नाहीत असं म्हटलं. ‘गेल्या अनेक वर्षांपासून मी इंडस्ट्रीत काम करतेय. मराठी इंडस्ट्री एका कुटुंबासारखी आहे. सगळेच इथे एकमेकांना खूप सांभाळून घेतात, एकमेकांची मदत करतात,’ असं सोनालीने सांगितलं.