मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती तृप्ती भोईर लग्न बंधनात अडकली आहे. अभिनयसोबतच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या तृप्तीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील उभरते संगीतकार टी सतीश चक्रवर्थी यांच्याशी नुकताच विवाह केला. हा विवाह सोहळा चेन्नई येथील एवीएम मेना हॉल येथे संपन्न झाला.
‘अगडबम’ या मराठी चित्रपटातील नाजूका या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात राहिलेली अभिनेत्री तृप्ती भोईर ही निर्माती पण आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ असे अनेक चित्रपट तृप्तीने दिग्दर्शित केले. या चित्रपटात तृप्तीला भरघोस यश मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन कल्पना अमलात आणणाऱ्या तृप्तीने ‘टुरिंग टॉकीज’, ‘हॅलो जय हिंद’, ‘अगडबम’, ‘तुझ्या माझ्या संसाराला अजून काय हवं’ या चित्रपटांमध्ये अभिनयदेखील केला. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्येही तिने काम केलेय. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात तृप्तीने मेहनतीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
सतीश चक्रवर्थीने प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान याच्या हाताखाली अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. ‘लीलै’ या चित्रपटाने त्याने संगीत दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘लीलै’ आणि ‘कनिमोझी’ या चित्रपटांना त्याने दिलेले संगीत बरेच गाजले.
तृप्ती लवकरच तिच्या चाहत्यांसाठी ‘अगडबम २’ हा चित्रपट घेऊन येणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. या चित्रपटातून ती निर्माती, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अशा तिहेरी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.