सध्या जुन्या गाण्यांच्या रिमेकचा ट्रेण्ड आहे. त्या त्या काळात गाजलेली काही जुनी गाणी आताच्या चित्रपटांमध्ये रिमिक्स करून वापरली जातात. बऱ्याचदा या रिमेकमध्ये रॅप समाविष्ट केला जातो आणि बदललेल्या चालीमुळे अनेकांना ती मूळ गाण्यासोबत केलेली छेडछाड वाटते. अशा रिमेक गाण्यांबाबतची नाराजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. याविषयी लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी मूळ चालीची मोडतोड करून उथळ शब्दांचा वापर केलेली रिमिक्स गाणी ऐकताना त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची रिमेक गाण्यांविषयी बातचित झाली आणि त्यानंतर लतादीदींनी हे खुलं पत्र लिहिलं. ‘हिंदी चलचित्र संगीताचा एक सुवर्ण काळ होता. त्या काळातील गाण्यांनी भारतीयांच्या हृदयात एक स्थान मिळवलंय. आजही कोट्यवधी रसिकांना ती गाणी आवडतात आणि भविष्यातही आवडतील. या सुवर्णकाळातील गाणी आता नव्या ढंगात रिमिक्सच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आणली जात आहेत. तरुणवर्गात ही गाणी खूप लोकप्रिय होत असल्याचं म्हटलं जातं. खरंतर यात काहीच समस्या नाही. परंतु गाण्याची मोडतोड करून ते पुन्हा सादर करणं अगदी चुकीचं आहे. आजकाल असंच काहीसं होत आहे आणि मूळ संगीतकारऐवजी दुसऱ्यांचंच श्रेयनामावलीत नाव दिलं जातं जे अत्यंत अयोग्य आहे. गाण्याच्या मूळ चालीला बदलणं, शब्दांमध्ये मनासारखे बदल करणं आणि पुन्हा नव्या आणि उथळ शब्दांचा वापर करणं यांमुळे खरंच ती गाणी ऐकताना त्रास होतो,’ असं त्यांनी पत्रात म्हटलंय.

वाचा : ‘वीरे दी वेडिंग’मधला करिनाचा तो लेहंगा २५ वर्षांपूर्वीचा

हिंदी चित्रपटांतील जुनी गाणी म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यासोबत छेडछाड करू नका अशी विनंती त्यांनी नवोदित कलाकारांना केली आहे. त्याचबरोबर फक्त लोकप्रियतेसाठी, प्रसिद्धीसाठी संगीताच्या खजिन्याचा दुरुपयोग करू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.