‘इंडियन आयडॉल’चा अकरावा सिझन चांगलाच गाजला. या शोची टीआरपी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. विशेष म्हणजे सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि परीक्षक नेहा कक्कर यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. फक्त अफेअरच नाही तर हे दोघं लग्न करणार असल्याच्याही अफवा पसरवल्या गेल्या. अर्थात हे सगळं फक्त शोच्या टीआरपीसाठी केलं गेलं. आता हा सिझन संपल्यानंतर आदित्यने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आदित्यने ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. ‘छोट्या पडद्यावर काम करायला मला खूप आवडतं. पण या कामामुळे मला रियाजसाठी वेळ देता येत नाहीये. त्यामुळे मी आता सहा महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. म्युझिक अल्बम, म्युझिक व्हिडीओ यांवर लक्ष केंद्रित करता येण्यासाठी मी हा ब्रेक घेत आहे. मी छोट्या पडद्यापासून कायमचा दूर नाही जाणार. कारण सहा महिन्यांनंतरचे शो मी आधीच साइन केले आहेत. त्यामुळे मी तुमच्या भेटीला नक्की येईन,’ असं त्याने लिहिलं.
आदित्य नारायण हा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. आदित्यने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने काही रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. त्याचा एक चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र तो बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला.