पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीनगरमध्ये गायक अदनान सामीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘रिदम इन पॅराडाइज’ असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. मात्र आता या कॉ़न्सर्टच्या यशावरून जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि अदनान यांच्यात ‘ट्विटर- वॉर’ सुरू झालं आहे.

७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला फार कमी लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. अशाच एका फोटोवर ओमर अब्दुल्ला यांनी कमेंट केली. या कमेंटने नाराज झालेल्या अदनाननेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं. त्यानंतर ट्विटरवर दोघांनीही एकमेकांवर जोरदार निशाणा साधला.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं की, ‘लोकांनी आता त्या रिकाम्या जागा भरल्या असतील अशी आशा आहे. संगीताची ही एक संध्याकाळ त्यांना शांतीच्या मार्गाकडे नेऊ शकली असती.’ यावर अदनान कार्यक्रमाचे फोटो शेअर करत ट्विटरवर उत्तर दिलं की, ‘तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात. संगीताच्या कार्यक्रमावर तुम्ही असा अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. कदाचित तुमची माहिती यंत्रणा पुरेशी सक्षम नसले. त्यांनी तुम्हाला या कॉन्सर्टविषयी चुकीची माहिती दिली.’

PHOTOS : सेलिब्रिटींचा करवा चौथ

यावर ओमर यांनी पुन्हा ट्विट केलं की, ‘तुमच्या हाऊसफुल शोमध्ये मी येऊ शकतो, असं तुला कसं वाटू शकतं. लोकांनी या संगीत कार्यक्रमाचा आनंद लुटला, याचं मला समाधान आहे. एकेकाळी मीसुद्धा तुझा चाहता होतो.’ मात्र, यानंतरही ट्विटरवर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची बराच वेळ सुरु होती.