अनुष्का शर्मा सध्या अॅमस्टडॅममध्ये ‘द रिंग’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असतानाही ती स्वतःसाठी वेळ काढायला आणि मजा मस्ती करायला विसरत नाही. शूटिंगमधून वेळ काढत ती तिथल्या काही मुलांबरोबर फुगे फोडण्यात मग्न झालेली दिसली. तिची मुलांबरोबर लागलेली ही स्पर्धा बघता तिही एक लहान मुलगीच झाल्याचे दिसत आहे.
इम्तियाज अलीचा ‘द रिंग’ या सिनेमाचे शूटिंग सध्या अॅमस्टडॅममध्ये सुरु आहे. या सिनेमात अनुष्का आणि शाहरुख खान यांची जोडी दाखवण्यात आली आहे. या सिनेमासाठी अनुष्का जास्तच उत्साहित आहे. याबद्दल ती आधीही बोलली आहे. शाहरुख आणि अनुष्काचा हा तिसरा सिनेमा आहे ज्यात ते एकत्र काम करणार आहेत. याआधी ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमातून ते दोघे एकत्र आले होते. या सिनेमातले शाहरुखचे अनेक लूक आतापर्यंत समोर आले आहेत. फक्त त्याचेच नाही तर त्याचा मुलगा अब्राम आणि त्याची सेटवरची मस्तीही व्हिडीओमधून समोर आली आहे.
नुकतेच या सिनेमाचे प्रागमध्ये चित्रिकरण संपले. शाहरुखने प्रागमध्ये असतानाचे काही फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले होते. ‘द रिंग’ सिनेमामुळे शाहरुख आणि इम्तियाज अलीला पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. यात शाहरुख एका टूरिस्ट गाइडच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय त्याचे ‘डियर जिंदगी’ आणि ‘रईस’ हे सिनेमेही लवकरच प्रदर्शित होणार आहेत.