‘शिकारी’चा विषय वेगळा आणि मस्त होता त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. हा एक विनोदी आणि संपूर्णत: व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मानवंदना आहे. तुम्हाला आणि विशेषत: मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या क्षेत्रात या, पण आंधळेपणाने वावरू नका’, हा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याची माहिती ‘शिकारी’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता प्रसिध्द दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी दिली.
कथा आणि मांडणीतीली प्रयोगासाठी ओळखल्या जाणाऱ्या महेश मांजरेकर यांचा ‘शिकारी’ हा नवीन चित्रपट २० एप्रिलला महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांनी केले असून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वत:चे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि नेहा खान ही जोडी या चित्रपटातून दिसणार आहे. नेहा खानचा हा पहिलाच चित्रपट असून या दोघांबरोबरच कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
या चित्रपटाची पोस्टर्स नुकतीच झळकली आणि मराठी चित्रपट रसिकांमध्ये त्याबद्दल चर्चा सुरु झाली. हा चित्रपट विनोदी आहे की ती एक सेक्स कॉमेडी आहे? की ती एक सामाजिक अंगाने जाणारी नाटय़मय कलाकृती आहे, याबद्दल रसिकांमध्ये उत्सूकता आहे. ‘स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्यांच्या भूमिकेत असले तरी हा चित्रपट आकार घेत असताना त्यांनी दिलेले योगदान खूप खूप मोठे आहे’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.