सलमान खान वास्तव्यास असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेल्या १४ वर्षांपासून गणपतीची धुमधडाक्यात प्रतिष्ठापना केली जाते. दीड दिवसांमध्ये बाप्पाची मनोभावे सेवा करून त्याचं विसर्जनही तेवढ्याच उत्साहात केलं जातं. सलमान मुंबईत नसला तरी बाप्पाच्या सेवेत कोणतीही कमतरता पाहायला मिळत नाही.

…तर १४ वर्षांपूर्वीच बालिका वधूमध्ये दिसले असते रणबीर- आलिया

पण तुम्हाला माहित आहे का, यावर्षी सलमानच्या घरी बाप्पाचं आगमन होणार नाही. यावर्षी नेमकं असं काय झालं असेल, की सलमानच्या घरी बाप्पा येणार नाही, असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. याविषयी तुमच्या मनात एखादा नकारात्मक विचार येत असेल. पण तुम्ही जसा विचार करताय तसं काही नाहीये… यावर्षी खान कुटुंबीयांच्या घरी येणाऱ्या बाप्पाचं आगमन गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये नव्हे, तर अर्पिता खान-शर्माच्या घरी होणार आहे. गेल्या १४ वर्षांमध्ये जे झालं नाही ते यावर्षी होणार आहे.

गेल्या वर्षी सिनेमाच्या चित्रीकरणामुळे सलमान खान गणेशोत्सवाच्या काळात घरी थांबू शकला नव्हता. यावर्षी मात्र सलमान अगदी धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत करणार आहे. यासाठी त्याने खास ‘टायगर जिंदा है’ सिनेमाच्या चित्रीकरणातून एक दिवसाचा वेळ काढला आहे. सध्या सलमान या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अबुधाबीला आहे. २५ तारखेला तो मुंबईत येणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा अबुधाबीसाठी रवाना होणार आहे.

‘एक था टायगर’ या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. या सिनेमात सलमान आणि कतरिना अफलातून स्टंट करताना दिसणार आहेत. या स्टंटमध्ये ते पाण्याखाली खलनायकाशी दोन हात करताना दिसतील. त्यांच्या या स्टंटमुळे सिनेमाची लांबीही खूप वाढल्याचे समजते. सलमान आणि कतरिना ही हिट जोडी पाच वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमात ते शेवटचे एकत्र दिसले होते.