छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादाग्रस्त असा रिअॅलीटी शो ‘इंडिय आयडल १२’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या शोमधील एका एपिसोडमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा गायक-दिग्दर्शक अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी स्पर्धकांची प्रशंसा करण्यास शोच्या निर्मात्यांनी सांगितल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी शोवर टीका केली. काही गायकांनी देखील हे खरं असल्याचे म्हटले होते. आता या वादावर गायक सलीम मर्चेंटने वक्तव्य केले आहे.

सलीम यांनी यापूर्वी इंडियन आयडलमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. आता त्यांनी सध्या इंडियन आयडलवरुन सुरु असलेल्या वादावर वक्तव्य केले आहे. त्यांनी नुकताच आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना इंडियन आयडलबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुम्ही जेव्हा इंडियन आयडलमध्ये परीक्षक म्हणून काम करत होतात तेव्हा तुम्हाला देखील स्पर्धकांची प्रशंसा करण्यास सांगितले होते का?’ असा प्रश्न सलीम यांना विचारण्यात आला होता.

आणखी वाचा : ‘समांतर २’मधील कुमार महाजन नियतीचा फेरा चुकणार?

त्यावर उत्तर देत सलीम म्हणाले, ‘हो मला देखील असे करण्यास सांगितले होते. पण खरे सांगायचे झाले तर मी कधीही त्यांचे ऐकले नाही. याच कारणामुळे आज मी कोणत्या ही शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत नाही.’

‘मी स्पर्धकांची प्रशंसा करताना त्यांच्यामधील टॅलेंट पाहात असे. मला माहिती आहे जर एखाद्या स्पर्धकाची तुम्ही प्रशंसा केली तर तो आणखी चांगले गाणे गातो. बऱ्याचवेळा असे देखील झाले आहे की दिग्दर्शकांनी आम्हाला निगेटिव्ह काही बोलू नका असे म्हटले आहे. तरी देखील मी स्पर्धकांच्या चुका काढायचो’ असे पुढे म्हणाला.