अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला चांगलाच दम दिला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का कारमधून प्रवास करत असताना समोरच्या कारमधून पाण्याची रिकामी बाटली बाहेर फेकण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करत तिने दम दिला आणि पुन्हा असं न करण्याची तंबीही दिली. हा व्हिडिओ विराट कोहलीनं ट्विटरवर पोस्ट केला. अनुष्काचं अनेकांनी कौतुक केलं मात्र काहींनी नकारात्मक टिप्पणीसुद्धा केली. तर ज्या व्यक्तीने तो कचरा रस्त्यावर फेकला, त्यानेही अनुष्काने ज्याप्रकारे आवाज चढवला, त्याविरोधात सोशल मीडियावर टीका केली.

अरहान सिंग नावाच्या या व्यक्तीने अनुष्काच्या व्हिडिओचा स्किनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली. ‘या पोस्टद्वारे मी कोणतीही प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी बेजबाबदारपणे वागलो ते चुकलंच. मी निष्काळजीपणे रिकामी बाटली रस्त्यावर फेकला. तेव्हा तिथून जाणाऱ्या अनुष्का शर्माने आपल्या कारच्या खिडकीची काच खाली करत माझ्यावर वेड्यासारखी ओरडत होती. माझ्या चुकीबद्दल मी माफीदेखील मागितली. पण अनुष्का शर्मा कोहली, तेच जर तू नम्रपणे सांगितलं असतंस तर स्टार म्हणून तुझं महत्त्व कमी झालं नसतं. स्वच्छतेच्या जाणीवेसोबतच बोलण्यातही थोडी सभ्यता असायला हवी. माझ्या कारमधून फेकला गेलेला कचरा तुझ्या तोंडून निघालेल्या कचऱ्यापेक्षा कमीच होता,’ असं त्या व्यक्तीने लिहिलं. यासोबतच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी पोस्ट केल्याचा आरोप करत अरहानने विराट कोहलीवरही निशाणा साधला.

https://twitter.com/imVkohli/status/1007952358310055937

https://www.instagram.com/p/BkFpknoFktw/

अरहानसोबतच अनेकांनी सोशल मीडियावर अनुष्का- विराटवर टीका केली. रस्त्यावर कचरा न फेकणं हे सांगणं चुकीचं नसून त्याचा व्हिडिओ पोस्ट करायची काय गरज होती असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

Story img Loader