वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेली ज्वेलर्सची जाहिरात मागे घेण्यात आली आहे. बँक कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्थेच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘कल्याण ज्वेलर्स’ला ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर्सकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे या प्रसिद्ध ज्वेलर्सने जवळपास दीड मिनिटांची आपली जाहिरात मागे घेतली आहे.

‘अनवधानाने आमच्याकडून भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आम्ही माफी मागतो आणि सर्व माध्यमांतून आम्ही ती जाहिरात हटवली आहे,’ असं स्पष्टीकरण कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमन यांनी दिलं आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या भावना आमच्या जाहिरातीमुळे दुखावल्या आहेत. पण आमच्याकडून हे अनवधानाने घडलंय. ही जाहिरात पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असंही ते म्हणाले.

अमिताभ बच्चन हे कल्याण ज्वेलर्सचे सदिच्छादूत आहेत. या ब्रँडची जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. या जाहिरातीत पहिल्यांदाच श्वेता बच्चनदेखील झळकली. मात्र या जाहिरातीवर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं आक्षेप घेतला आहे. ‘ही जाहिरात अत्यंत हिन दर्जाची असून यात बँक कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत’ असा आरोप ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर कॉन्फिडरेशनच्या सरचिटणीस सौम्या दत्त यांनी केला होता. तसेच आता या प्रकरणी कल्याण ज्वेलर्सला कोर्टात खेचण्याचा इशारही देण्यात आला होता.