‘सारा जमाना हसीनो का दिवाना…’ या गाण्यात बदल करुन आता काही दिवसांनी ‘सारा जमाना सेलिब्रिटी किड्स का दिवाना’ असं गाणं प्रचलित होणार आहे. कारण, चित्रपट वर्तुळात सध्याच्या घडीला शाहरुख, सैफ, श्रीदेवी या कलाकारांच्या मुलांचा वावर वाढला असून, या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाच्याही बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली असून, त्या सेलिब्रिटी किडकडून अनेकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत असं म्हणायला हरकत नाही. सेलिब्रिटी किड्सच्या यादीत सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं एक नाव म्हणजे सुहाना खान.

गेल्या वर्षी शाहरुखच्या या लाडक्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शालेय कार्यक्रमादरम्यानच्या या व्हिडिओमध्ये तिचा स्टेज परफॉर्मन्स पाहण्याची संधी अनेकांनाच मिळाली होती. तेव्हापासूनच सुहानासुद्धा आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याचंही अनेकजण म्हणत आले. आता हीच वक्तव्ये खरी होताना दिसणार असल्याची चिन्हं आहेत. कारण, शाहरुखचा जवळचा मित्र, चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर सुहानाला लाँच करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तिच्या फोटोशूटमध्येही करणने बरीच मदत केली होती.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

करणच्या ऑफिसमध्ये सुहानाची ये- जा वाढली असून ती ग्रूमिंगचे धडेही घेतेय. त्यामुळे येत्या काळात करणच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘इन्ट्रोड्यूसिंग सुहाना’ खान अशी ओळ वाचायला मिळाली तर थक्क होण्याचं कारण नाही. बॉलिवूडमध्ये करणने आजवर बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी दिलीये. त्यातही करण, शाहरुखचा घरोबा पाहता सुहानाला ‘केजो’ने लाँच केलं तर त्याच नवल वाटण्यासारखं काहीच नाही.
दरम्यान, आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांच्या मागोमाग श्रीदेवीच्या मुलीला लाँच करणारा करण आता आपल्या जिवलग मित्राच्या मुलीच्या करिअरमध्येही हातभार लावतोय असं म्हणायला हरकत नाही.