छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या रुपेरी पडद्यावर दमदार कामगिरी करत आहे. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो चे’, ‘केदारनाथ’ या चित्रपटांतील त्याच्या अभिनय कौशल्याचं कौतुक झालं. या हिट चित्रपटांमुळे सध्या बॉलिवूडमध्ये सुशांतचीच चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट त्याच्यासाठी लकी ठरला आहे. कारण याच चित्रपटानंतर त्याला जवळपास १२ नवीन चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुशांतने स्वत: ही माहिती दिली आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांत म्हणाला, ‘१२ चित्रपटांशी संबंधित माझी चर्चा सुरू आहे पण त्यापैकी सुरुवात कशाने करावी हे मला कळत नाहीये.’ ‘केदारनाथ’मध्ये सुशांत आणि सारा अली खानची मुख्य भूमिका होती. सैफ अली खानची मुलगी साराचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर सुशांत आगामी ‘सोन चिडिया’ आणि ‘किझी और मॅनी’ या दोन चित्रपटांत झळकणार आहे. याशिवाय ‘छिछोरे’ आणि ‘चंदा मामा दूर के’ यामध्येही तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचा : के एल राहुलचा मलायकावर होता क्रश पण..

सुशांतचं अभिनय, पडद्यावर त्याचा सहज वावर प्रेक्षकांना फार आवडतो. म्हणूनच कदाचित निर्मात्यांचीही सुशांतला पसंती आहे. विशेष म्हणजे एकाच पठडीतल्या भूमिका तो साकारत नाही. भूमिकेतील विविधतेला तो प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नवीन वर्षात चाहत्यांना सुशांतच्या चित्रपटांची मेजवानी असेल यात काही शंका नाही.

Story img Loader