चित्रपट हे समाजाचा आरसा असल्याचे म्हटले जाते. पण बऱ्याच वेळा हेच चित्रपट आपल्याला खऱ्याखुऱ्या आयुष्यापासून दूर काल्पनिक विश्वात घेऊन जाताना दिसतात. कदाचित याच कारणामुळे आपण चित्रपटांमध्ये कलाकारांनी काय परिधान केले आहे याकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र काही चित्रपट असे आहेत ज्यामध्ये कलाकारांनी परिधान केलेले कपडे आपण परिधान करावे अशी इच्छा अनेकांची असते. कलाकारांनी परिधान केलेल्या कपड्यांचे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर नेमकं काय केलं जातं? असा प्रश्न अनेकांना पडतो. स्टायलिस्ट आयशा खन्नाने या कपड्यांचे पुढे काय केले जाते याचा खुलासा केला आहे.

यशराज फिल्मची स्टायलिस्ट आयशा खन्नाने ‘मिड डे’शी बोलताना चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे पुढे काय होते याचा खुलासा केला आहे. चित्रपटात वापरण्यात येणारे कपडे बऱ्याच वेळा सांभाळून ठेवण्यात येतात आणि त्यावर त्या चित्रपटाचा टॅग लावण्यात येतो. त्यानंतर ते ज्यूनिअर आर्टिस्टसाठी वापरण्यात येतात. कधी कधी त्याच प्रोडक्शन हाऊसच्या दुसऱ्या चित्रपटासाठी देखील त्या कपड्यांचा वापर केला जातो. पण ते वापरताना सतर्क राहून त्यावर काम करावे लागते. जेणे करुन प्रेक्षकांना तो ड्रेस पुन्हा वापरला आहे हे कळणार नाही. पण सर्वच कपड्यांचा पुन्हा वापर होत नाही. काही खास वेशभूषा कलाकार चित्रपटाची आठवण म्हणून स्वत:कडे ठेवतात.

बऱ्याच वेळा हाय प्रोफाइल सेलिब्रिटी डिझायनर एखाद्या चित्रपटासाठी आपले कपडे देतात. पण चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर ते कपडे परत घेऊन जातात. असे ‘देवदास’ आणि ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान झाले आहे. कधी कधी या कपड्यांचा लिलाव देखील केला जातो. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटातील कपड्यांचा लिलाव करण्यात आला होता आणि या लिलावामधून मिळालेले पैसे एका स्वयंसेवी संस्थेला दान करण्यात आले होते.