‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या मालिकेतील बरेचसे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. मात्र यात ‘सोहम’ ही व्यक्तीरेखा साकारणारा नवखा कलाकार प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. तर आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. मालिकेत सोहमची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्यात काय बदल घडले याबद्दल त्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

लोकांच्या प्रतिसादाबद्दल तो म्हणाला, “होय, माझी भूमिका थोडी नकारात्मक आहे. सोहम हा बिघडलेला मुलगा आहे ज्याला त्याच्या आईची काहीच काळजी नसते. काहीजण काल्पनिक घटना म्हणून मालिका बघतात, तर काहीजण मालिकेच्या कथेत गुंतून जातात आणि त्यांना ते खरं आहे असं वाटू लागतं. एकदा मी, माझा मित्र आणि त्याचे बाबा एकत्र दुपारी जेवायला बाहेर गेलो होतो. माझ्या मित्राचे बाबा ही मालिका पाहतात आणि त्यांनी चक्क त्याला विचारलं की, आशुतोष हा खऱ्या आयुष्यातसुद्धा सोहमसारखा आहे का? इतकंच नव्हे तर माझ्या शेजारचे मालिका पाहण्याआधी माझ्याशी नीट वागत होते. पण आता ते मला दुर्लक्ष करतात.” या सर्व गोष्टींकडे सकारात्मकरित्या पाहत असल्याचं आशुतोष सांगतो.

आणखी वाचा : जास्त गोरेपणामुळे मला चित्रपट मिळाला नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

सोहमची भूमिका कशी मिळाली याबद्दलही आशुतोषने सांगितले. “सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा माझ्या वडिलांनी सुनिल भोसले यांच्याशी माझी ओळख करून दिली. मी केदार शिंदेसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सुनिल भोसले यांनी माझं काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी ‘अग्गंबाई..’साठी माझं ऑडिशन घेतलं. माझी निवड होईल याबाबत मला खात्री नव्हती. मित्रांसोबत मी गोव्याला फिरायला गेलो होतो. गोव्याला पोहोचताक्षणी मला सुनिल सरांचा फोन आला आणि त्यांनी मला कॉस्च्युम ट्रायलसाठी बोलावलं. मी इतका उत्साहित होतो की लगेच फ्लाइटची तिकीट बुक केली आणि गोव्याहून निघालो. दुसऱ्या दिवसापासून मी अग्गंबाई.. साठी शूटिंगला सुरुवात केली”, असं त्याने सांगितलं.