पॉपस्टार जस्टिन बिबरच्या अफलातून परफॉर्मन्सनंतर आंतरराष्ट्रीय संगीत जगातील आणखी एक प्रसिद्ध गायक एड शीरन भारतात येणार आहे. १९ नोव्हेंबर २०१७ला तो भारतात परफॉर्म करणार आहे. त्याची एशिया टूर सध्या चर्चेत आली असून एडच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. एड त्याच्या या एशिया टूरमध्ये टोकिेयो, हाँगकाँग, सिंगापूर, बॅंकॉक या ठिकाणांनाही भेट देणार आहे.

वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या तारखांच्या यादीत मुंबईचाही उल्लेख आहे. त्यामुळे एडच्या ‘शेप ऑफ यू’ या गाण्याचा आवाज मुंबईरांनाही वेड लावणार असं म्हणावं लागेल. ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक एड शीरन ‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या गाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनाही वेड लावलंय. सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्ये त्याच्या या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन्सही शेअर केले आहेत.

ed-sheeran

शीरनची लोकप्रियता पाहता आता त्याच्यासाठीसुद्धा मुंबईकर सज्ज आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे ख्रिस मार्टिन आणि त्याचा ‘कोल्डप्ले’ हा बॅण्ड भारतात येण्याच्या बरोबर एक वर्षानंतर एड शीरनच्या सुरांची जादू अुभवता येणार आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असे गायक भारतात येऊन त्यांची कला सादर करत आहेत. ख्रिस मार्टिन, जस्टिन बिबर आणि त्याच्या मागोमाग आता एड शीरन या कलाकारांच्या येण्याने प्रेक्षकांनाही या कलाकारांना जवळून पाहण्याची संधी मिळत आहे.