लग्नानंतर रणवीर सिंगचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणवीर आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रणवीरचं अभिनय, रोहितचं दिग्दर्शन हे समीकरण प्रेक्षकांना फारच आवडलं आहे. सर्वांनी जरी कौतुक केलं तरी एका व्यक्तीची प्रतिक्रिया रणवीरसाठी नक्कीच फार महत्त्वाची आहे. ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिकाने हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर तिने काय प्रतिक्रिया दिली हे स्वत: रणवीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
‘चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या बायकोला रोहित शेट्टीबरोबर माझाही अभिमान वाटला. तिने रोहितचं खूप कौतुक केलं,’ असं तो म्हणाला. दीपिकाने रोहित शेट्टीसोबत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी काम केलं आहे. तर रणवीर आणि रोहित ‘सिम्बा’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मंगळवारी आयोजित केलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला दीपिकाने हजेरी लावली होती. तिला चित्रपट खूप आवडल्याचं रणवीरने सांगितलं.
वाचा : या पाच कारणांसाठी पाहा रणवीर सिंग- रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’
‘सिम्बा’मध्ये रणवीर- सारासोबतच अकरा मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटाच्या कथानकावर थोडाफार हा चित्रपट आधारित आहे. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी या सर्व गोष्टींचा तडका ‘सिम्बा’मध्ये पाहायला मिळत असून रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.