मालिका आणि प्रेक्षक यांचं एक अतूट नातं असतं. काही मालिका या अशा असतात की ज्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. तर काही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. अशीत एक मालिका नुकतीच सुरू झाली आहे ती म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. नुकतीच सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून टीआरपीच्या यादीतही मालिका पहिल्या पाच स्थानांत पोहोचण्यात यशस्वी ठरली आहे.

२० ते २६ जुलै या आठवड्यात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली आहे, ‘तुझ्यात जीव रंगला’. टीआरपीच्या यादीत या मालिकेने पहिलं स्थान मिळवलंय. या मालिकेत हार्दिक जोशी आता राजा राजगोंडा ही भूमिका साकारत असून त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. तर यादीत दुसऱ्या स्थानी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आहे. ‘चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न’ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेलिब्रिटी पॅटर्नला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या यादीत चौथ्या स्थानावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ तर पाचव्या स्थानावर ‘अग्गंबाई सासूबाई’ आहे.

आणखी वाचा : सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’मध्ये रेणुका शहाणे मुख्य भूमिकेत

काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात तेजश्रीने शुभ्रा ही भूमिका साकारली आहे. तर आशुतोष बाबड्या उर्फ ‘सोहम’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.