ऐश्वर्या राय बच्चनचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या आंध्रप्रदेशमधील २९ वर्षीय संगीत कुमारचे नाव सध्या भलतेच चर्चेत आहे. या संपूर्ण प्रकरणात बच्चन कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशाखापट्टणम येथील पोलिसांनी सांगितले की, जर ऐश्वर्याने या प्रकरणात तक्रार दाखल केली तरच संगीतविरोधात कार्यवाही केली जाईल तसेच, त्याला कोणता मानसिक आजार तर नाही ना याची चौकशी करण्यात येईल. मात्र, संगीतने असा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने असे खोटे दावे केले आहेत.

रिपोर्ट्सनुसार काही दिवसांपूर्वी संगीतने तो प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानचा शिष्य असल्याचे म्हटले होते. पण तेव्हा हे प्रकरण जास्त चर्चेत आलं नव्हतं. संगीत हा आंध्रप्रदेश येथील राज्य रस्ता वाहतूक महामंडळात काम करणाऱ्या एका बस कंडक्टरचा मुलगा आहे. संगीतच्या मते, त्याचे संपूर्ण बालपण विशाखापट्टनम येथील चोडवरम येथे गेले. १९८८ मध्ये ऐश्वर्या रायने आयव्हीएफमार्फत लंडनमध्ये त्याला जन्म दिला.

जन्मापासूनच कुटुंबामुळे तो आपल्या आईसोबत राहू शकला नव्हता. आश्चर्य म्हणजे तेव्हा ऐश्वर्याचे वय फक्त १५ वर्षे होते.’ ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकत्र राहत नाहीत. त्यामुळे आईने माझ्यासोबत मंगळुरूमध्ये येऊन राहावे हीच माझी इच्छा आहे. मी तिच्यापासून २७ वर्षे दूर राहिलो आहे, पण आता तिच्यासोबतच मला राहायचे आहे’, असे त्याचे म्हणणे आहे.

याआधी कधीही संगीतचे ऐश्वर्याशी बोलणे झाले नाही. दोघांमध्ये कधीही संभाषण होऊ शकले नसल्याचे मुख्य कारण त्याचे नातेवाईक असल्याचे संगीत म्हणाला. त्याच्या घरातल्यांनी ऐश्वर्याबद्दल खरी माहिती कधी सांगितलीच नाही.

Story img Loader