कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राच्या मानधनावरून बऱ्याच चर्चा रंगल्या. तिने एका कार्यक्रमात पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी पाच कोटी रुपये घेतल्याने काहींनी तिच्यावर टीका केल्याचेही पाहायला मिळाले. अशाप्रकारे मानधनावरून अनेक किस्से रंगतात. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये प्रियांका, दीपिका पदुकोण, कंगना रणौत या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत. या यादीत आता ऐश्वर्या राय बच्चनचेही नाव जोडले जात आहे. एकेकाळी ऐश्वर्यासुद्धा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. पण, लग्न आणि त्यानंतर मुलीच्या संगोपनासाठी ती रुपेरी पडद्यापासून दुरावली. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
वाचा : अक्षयला टक्कर देणार मौनी रॉयचा प्रियकर
१९६७ मध्ये आलेल्या ‘रात और दिन’ या नर्गिस दत्त यांच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऐश्वर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात नर्गिस यांनी मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. नम्र स्वभाव असलेली ‘वरुणा’ आणि सुख हेच अंतिम उद्दिष्ट मानणारी ‘पेनी’ त्यांनी लिलया साकारली होती. याचीच पोचपावती म्हणजे ‘रात और दिन’मधील भूमिकेसाठी नर्गिस यांना त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता ऐश्वर्या त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणार आहे. पण, ऐश्वर्याच्या भूमिकेपेक्षा तिच्या मानधनाबद्दलच अधिक चर्चा होत आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्याने तब्बल १० कोटी रुपये घेतल्याचे समजते.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिका साकारत असल्यामुळे तिने अधिक तयारी करण्याची गरज आहे. या चित्रपटासाठी बराच वेळ लागणार आहे. यासाठी तिला इतर चित्रपटांच्या कामाकडे काही काळाकरिता पाठ फिरवावी लागेल. त्यामुळे निर्मात्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता तिने मागितलेल्या मानधनासाठी होकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
वाचा : ऐश्वर्याला आई म्हणणाऱ्याने रेहमानशीही जोडले होते नाते
खरंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील पुरुष कलाकारांचे मानधन पाहता ऐश्वर्या किंवा इतर अभिनेत्री घेत असलेली रक्कम त्या तुलनेत कमीच आहे. असे असले तरी ऐश्वर्याच्या मानधनाचा आकडा अनेक समजुतींना शह देतोय असं म्हणायला हरकत नाही.