बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या मागील दोन चित्रपटात मात्र अगदी लहानशी भूमिका करताना दिसली. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अशी अचानक छोट्या भूमिकांकडे कशी काय वळली असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला. या प्रश्नांची उत्तरं नुकतीच ऐश्वर्यानं ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेसो’ चॅट शोमध्ये दिली.

२०१६ साली आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात ऐश्वर्याची अवघ्या काही मिनिटांची भूमिका होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘फन्ने खान’मध्येही ऐश्वर्याची भूमिका असून नसल्यासारखीच होती असंही मत अनेकांनी व्यक्त केलं. गेल्या दोन चित्रपटात अगदी लहान भूमिका निवडण्यामागचे तिचे विचार तिनं या चॅटशोदरम्यान व्यक्त केलं आहे. ‘कलाकारानं नेहमीच आपल्या भूमिकेत वैविध्य शोधलंच पाहिजे, ते मी करत आहेत. मी सध्या प्रयोग म्हणून वेगळी वाट निवडली आहे. माझ्यामते तुमची भूमिका किती मोठी आहे हे महत्त्वाचं नाही चित्रपटाचं कथानक जर दमदार असेल तर छोटी भूमिकाही साकारण्यास माझी हरकत नाही’ असं ती म्हणाली.

तसेच तिनं प्लास्टिक सर्जरीवरदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. प्लास्टिक सर्जरी एखाद्यानं करावी की करू नये असा सल्ला मी कोणालाही देणार नाही. प्रत्येकानं विचार करून आणि माहिती घेऊनच हा निर्णय घ्यावा असंही ती म्हणाली.