बच्चन कुटुंबातील सर्वांत लहान सदस्य म्हणजे आराध्या. ती संपूर्ण घराची लाडकी आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक फोटो फार चर्चेत आहे. दसरा पूजेनिमित्त ऐश्वर्या व अभिषेक आराध्याला घेऊन एका मंदिरात गेले होते. त्यावेळीचा हा फोटो असून त्यातील आराध्याला पाहून नेटकऱ्यांना ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील अंजलीची आठवण होत आहे.

‘कुछ कुछ होता है’मधील आठ वर्षांच्या अंजलीचा हेअरकट फार प्रसिद्ध झाला होता. आराध्याचाही हेअरकट तसाच असून पारंपरिक पोशाखात ती हुबेहूब चित्रपटातील अंजलीसारखीच दिसत आहे. बच्चन कुटुंबातील स्टारकिड आराध्याने तिच्या मस्तीखोर अंदाजामुळे आणि निरागसतेमुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. जेव्हाही ती कॅमेऱ्यासमोर येते तिच्या हसण्यावरच सारे फिदा होतात.

अगदी लहान असल्यापासूनच आराध्या कधीही कॅमेऱ्यांना घाबरली नाही. लहानपणापासूनच ती अगदी सहजपणे छायाचित्रकारांना पोज देत आली आहे. आराध्याभोवती असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गराड्यावर भाष्य करताना ऐश्वर्या एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘शक्यतो जेवढे शक्य होते त्या सर्व मार्गाने आराध्याचं पोषण सर्वसामान्यांप्रमाणे व्हावे याच्यासाठी ती प्रयत्नशील असते. आराध्या अजून लहान आहे. तिला सगळं कळतं असं मी म्हणणार नाही. वयाच्या २० व्या वर्षी माझ्यासमोर या सर्व गोष्टी आल्या त्या आराध्याला जन्मापासून पाहाव्या लागत आहेत. त्यामुळे आराध्यासाठी यासर्व गोष्टी किती सहज आहे हे मला नाही माहीत.’