मुंबई पोलिसांनी अभिनेता अजय देवगणला सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी ब्रँड अम्बेसिडर बनवले आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बॉलिवूडचा ‘बाजीराव सिंघम’ अर्थात अजय देवगण मैदानात उतरला आहे. यासंदर्भात अजयने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेटदेखील घेतली.

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये अजय देवगण लोकांना आवाहन करत आहे की, ‘बँक कर्मचारी असल्याचं सांगून कुणी तुमचं कार्ड ब्लॉक करण्याच्या नावावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सीव्हीव्ही किंवा पासवर्ड मागत असेल तर तुम्ही त्यांना तुमचा पासवर्ड अजिबात देऊ नका.’

पोलीस नेहमीच ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यामातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आपला बँक खाते क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तींना देऊ नका असे पोलीस सारखे बजावत असतात. आता मुंबई पोलिसांनी लोकांच्या मदतीसाठी सायबर हेल्पलाईन क्रमांक ९८२०८१०००७ प्रसिद्ध केलाय. नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात या क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

वाचा : ‘वॉण्टेड’ गर्ल आएशाच्या ‘जिंदगी’ला नवे वळण

महाराष्ट्र पोलिसांच्या या उपक्रमाबाबत बोलताना अजय म्हणाला, ‘मी मुंबई पोलिसांच्या डिजीटल मोहिमांना नेहमीच फॉलो करतो. मुंबई पोलिसांसोबत शहर आणि देशाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात माझे योगदान देण्यात मला खूप अभिमान वाटतोय.’