दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि ‘गोलमाल अगेन’च्या टीमसाठी खूशखबर आहे. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. पहिल्या चार दिवसांतच १०० कोटींचा आकडा पार करणाऱ्या या चित्रपटाने अजूनही काही विक्रम रचले आहेत. आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’सोबत तगडी स्पर्धा असतानाही ‘गोलमाल अगेन’ने विक्रमी झेप घेतली. ‘गोलमाल’ सीरिजमधला हा चौथा चित्रपट असून, सर्वांत जास्त खर्च रोहितने या चित्रपटासाठी केला आहे. यातील दृश्यं, सिनेमॅटोग्राफी पाहून प्रेक्षकांना याचा अंदाज सहज येऊ शकतो. यावर्षीचा सुपरहिट ठरत असलेल्या या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणने मानधन घेतलेच नाही.

खरंतर, चित्रपटांच्या बाबतीत हे वर्ष फारसं सकारात्मक ठरलं नाही. ‘ट्युबलाइट’, ‘शेफ’, ‘जग्गा जासूस’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘सिमरन’ असे चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. तर दुसरीकडे ‘गोलमाल अगेन’ मात्र कमाईच्या बाबतीत यशस्वी ठरतोय. अजयने एक रुपयाही मानधन घेतलं नसलं तरी नफा कमावण्याचं त्याचं एक वेगळंच गणित समोर येत आहे. आता जरी त्याला या चित्रपटातून काहीच मिळालं नसलं, तरी पुढील तीन ते चार महिन्यांत त्याला याचा नफा मिळणार आहे. यामागचं कारण म्हणजे त्याने ‘गोलमाल अगेन’चे प्रसारणाचे अधिकार विकत घेतले आहेत.

वाचा : जेव्हा कपिलने स्वत:ला कार्यालयात घेतलेलं डांबून…

सर्वसाधारणपणे, एखाद्या चित्रपटाच्या प्रसारणाचे अधिकार हे प्रदर्शनाच्या दोन ते तीन महिन्यांनंतर विकले जातात. चित्रपटाला किती यश मिळालं यावर त्याची किंमत ठरवली जाते. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत असल्याने त्याच्या प्रसारणाच्या अधिकारासाठीही तगडी रक्कम दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. ‘गोलमाल’ सीरिजमधले चित्रपट अजूनही काही वाहिन्यांवर आठवड्याअखेर प्रसारित केले जातात. त्यामुळे प्रसारणाचे अधिकार विकत घेतल्याचा चांगलाच फायदा अजय देवगणला होणार आहे.

Story img Loader