अजय देवगणचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बादशाहो’चा टीझर प्रदर्शित झालाय. यामध्ये अजय देवगण, इमरान हाश्मी, विद्युत जामवाल जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहेत. याआधी सिनेमाचे सहा पोस्टर प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये सहा मुख्य कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती. या टीझरची सुरुवातच आणीबाणीच्या घोषणेने होताना दिसते. १९७५ साली आणीबाणीदरम्यान सोन्याने भरलेला ट्रक लुटणाऱ्या सहाजणांची कथा या सिनेमात मांडली आहे. ‘बादशाहो’चं चित्रीकरण राजस्थानमध्ये करण्यात आलंय. राजस्थानमधील वाळंवटातील चित्रीकरण, धडाडत्या गोळ्यांचे आवाज आणि वजनदार भाषा यांमुळे टीझर पाहून सिनेमाविषयी अधिक उत्सुकता वाढते.

१९७५ मध्ये देशाच्या राजकारणाने एक मोठं वळण घेतलं होतं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती. त्याचदरम्यान सहा जण ९६ तासांमध्ये सोन्याने भरलेला एक ट्रक ६०० किलोमीटर दूर नेत लुटण्याचा प्रयत्न करतात. टीझरच्या सुरुवातीला काही जुने फुटेज वापरण्यात आले आहेत आणि पार्श्वभूमीत राजस्थानी अंदाजात अजय देवगणचा आवाज ऐकू येतो.

पोस्टरमध्ये दाखवलेल्या सर्व मुख्य भूमिकांसोबतच सनी लिओनीचीही एक झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. ‘बादशाहो’ एक अॅक्शन थरारपट असून मिलन लुथरिया यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये अजय देवगण, इमरान हाश्मी, विद्युत जामवाल, संजय मिश्रा, इशा गुप्ता आणि इलियाना डिक्रूझ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या टीझरने सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवली असून १ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये ‘बादशाहो’ काय कमाल दाखवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.