बॉलिवूडमध्ये तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविणऱ्या अजयचा आज वाढदिवस. नव्वदच्या दशकात सुरुवातीला अजय देवगणने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अजयने पदार्पणाच्या चित्रपटातून बॉलिवू़डमधील ‘लंबी रेस का घोडा..’ असल्याचे संकेतच त्याने दिले. अजयचे वडील वीरु देवगण खुद्द चित्रपटातील स्टंट दृश्यांचे मार्गदर्शक असल्यामुळे अजयची चित्रपटात निर्माण झालेली अॅक्शन हिरोची झलक त्याला उपजत मिळाली हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, अजय फक्त या एकाच चाकोरीत अडकून राहिला नाही. अजयने त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये प्रत्येक भूमिका साकारत हरहुन्नरी अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. एका मुलाखतीत अजयने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. हजारोंचा जमाव जेव्हा अजयला मारायला आला होता, तेव्हा वीरू यांनी त्याला कसं वाचवलं हे त्याने सांगितलं.

साजिद खान व अजय यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. तो प्रसंग सांगताना साजिद म्हणाला, ‘एका हॉटेलजवळील छोट्या गल्लीतून अजय त्याच्या जीपमधून जात होता. त्यावेळी अचानक पतंग पकडण्यासाठी पळत असलेला छोटा मुलगा त्याच्या गाडीसमोर आला. अजयने पटकन ब्रेक दाबला आणि सुदैवाने अपघात टळला. पण तो लहान मुलगा घाबरून रडायला लागला. बघताचक्षणी तिथल्या लोकांनी अजयच्या जीपला घेराव घातला. जवळपास हजार लोकं त्याच्या जीपभोवती जमले होते. अजयची काहीच चूक नव्हती हे आम्ही जमावाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो पण कोणीच ऐकायला तयार नव्हते. ही बातमी पुढच्या दहा मिनिटांत अजयचे वडील वीरू यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते १५० ते २५० सुरक्षारक्षकांना घेऊन आले. एखाद्या चित्रपटात घडावं तसंच ते दृश्य होतं.’

वीरु देवगण हे सिनेसृष्टीत नावाजलेले होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये ८०हून अधिक चित्रपटांसाठी अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.