सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाची स्वत:ची एक ओळख असते. ही ओळख त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, नोकरी/व्यवसाय यातून जशी होत असते तशीच ती त्या व्यक्तीच्या नावावरूनही होत असते. खरंतर नावात काय आहे? असे दस्तुरखुद्द शेक्सपिअर म्हणून गेले असले तरी नावातच सगळे काही असल्याचा अनुभव बॉलिवूडच्या तारे-तारकांचा आहे. रुपेरी पडद्यावर पदार्पण करताना बॉलिवूडच्या काही कलावंतांनी आपले खरे नाव बदलले आणि आता तेच त्यांचे खरे नाव झाले आहे. यामध्ये बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचाही समावेश आहे. नाव बदलण्यामागचे कारण स्वत: अजयनेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, ‘माझे खरे नाव विशाल आहे. मात्र, पदार्पणापूर्वी मला हे नाव बदलावे लागले. त्यावेळी १९९१ मध्ये विशाल या नावाचे दोन-तीन अभिनेते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत होते. त्यापैकीच एक होता मनोज(कुमार) साहब यांचा मुलगा. दोघांपैकी एकाला नाव बदलणे गरजेचे होते. म्हणून मी माझे नाव बदलले.’

वाचा : शेतकरी मोर्चावर आमिर म्हणतो..

अजयचा आगामी ‘रे़ड’ हा चित्रपट १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्याने ही मुलाखत दिली होती. ‘बादशाहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अजय आणि इलियाना डिक्रूझ ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘रेड’च्या निमित्ताने अजय पुन्हा एकदा लक्षवेधी भूमिकेत दिसत असून यावेळी तो अजय पटनायइक या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय.