एकीकडे अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच त्याला टक्कर देण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित एक हॉलिवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स’ असं या चित्रपटाचं नाव असून स्वाती भिसे याचं दिग्दर्शन करत आहे. अमेरिकन अभिनेत्री देविका भिसे यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणार आहे. स्वाती भिसेंची मुलगी देविका मुख्य भूमिकेत असून, काही भारतीय कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतील. ज्यामध्ये मिलिंद गुणाजी आणि अजिंक्य देव यांचाही समावेश आहे.
डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटीश कलाकारांसोबतच नागेश भोसले, यतिन कार्येकर, मिलिंद गुणाजी, आरिफ झकारिया आणि अजिंक्य देव हे भारतीय कलाकार या चित्रपटात पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अजिंक्य देव तात्या टोपेंची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
PHOTO : ईशा गुप्ता रुग्णालयात दाखल
जोधपूरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, जोधपूरनंतर जयपूर आणि युके, मोरोक्कोतही चित्रीकरण करण्यात येईल. ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया’ कंपनीविरुद्ध झालेल्या १८५७च्या स्वातंत्र्य उठावात झाशीच्या राणीने दिलेला लढा या चरित्रपटाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.