‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमिका साकारलेले अभिनेते सीताराम पांचाल मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होते. प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी त्यांचं निधन झालं. कर्करोगाच्या उपचारासाठी शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली. या पोस्टमधून त्यांनी लोकांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं होतं.

‘मित्रहो माझी मदत करा, कर्करोगाने माझी तब्येत खालावतेय,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली होती. या पोस्टनंतर त्यांना लोकांनी मदतही केली होती. ‘पान सिंग तोमर’, ‘पीपली लाईव्ह’, ‘जॉली एलएलबी २’, ‘स्लमडॉग मिलिनेयर’, ‘बँडेट क्वीन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत सीताराम यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.

sitaram-panchal-1

sitaram-panchal-2

२०१४ मध्ये पांचाल यांना कर्करोग झाल्याचे कळले होते. त्यानंतर आजारी असतानाही त्यांनी ‘जॉली एलएलबी २’मध्ये अक्षय कुमारसोबत भूमिका साकारली. मागील १० महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नव्हता. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी मदत मागितली होती.

VIDEO : ‘हसीना पारकर’चा ट्रेलर लाँच

‘सीने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’सुद्धा त्यावेळी सीताराम यांच्या मदतीला धावून आलं होतं. असोसिएशनने आपल्या फेसबुक पेजवरून त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं. सीताराम यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ चित्रपटात त्यांनी लाला लाजपत राय यांची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘पीपली लाईव्ह’मध्ये भाई ठाकूरची भूमिका साकारलेली. ‘लज्जा’ आणि ‘हल्ला बोल’ चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारली होती.

sitaram