अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून राघव लॉरेन्सनं त्याचं दिग्दर्शन केलंय. दिवाळीत एखाद्या मोठ्या फटाक्याची वात पेटवताना मनात खूप अपेक्षा असतात. पण तो फटाका जर फुसका निघाला की जशी निराशा होती, तशीच निराशा ‘लक्ष्मी’ पाहिल्यावर होते.

कथा- आसिफ (अक्षय कुमार) आणि रश्मी (कियारा अडवाणी) या दोघांनी पळून लग्न केलेलं असतं. रश्मीच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध असतो आणि त्यामुळेच रश्मी लग्नानंतर कुटुंबापासून दुरावते. मात्र लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त रश्मीची आई तिला फोन करून घरी बोलावते. इथूनच मूळ कथेला सुरुवात होते. रश्मीच्या घरी जाताना आसिफ अनवधानाने त्या गूढ जागेवर जातो, तिथे गेल्यानंतर त्याचं पूर्ण आयुष्य बदलतं. भूत, प्रेत, आत्मा या गोष्टींवर कधीच विश्वास न ठेवणाऱ्या आसिफच्या शरीरात एका ट्रान्सजेंडरची आत्मा शिरते.

रिव्ह्यू- राघव लॉरेन्सच्या ‘कंचना’ या चित्रपटाचीच मूळ कथा ‘लक्ष्मी’मध्ये पाहायला मिळते. पण ती कथा सादर करताना काही बदल करण्यात आले आहेत. अक्षय कुमारची एण्ट्री दमदार आहे आणि नेहमीप्रमाणेच त्याचं अभिनय प्रशंसनीय आहे. पण जिथे चित्रपटाच्या कथेने वेग घेतला पाहिजे तिथे नाट्यमय दृश्यांमुळे घोर निराशा होते. या चित्रपटात शरद केळकरने छोटी पण तितकीच दमदार भूमिका साकारली आहे. थोड्या वेळासाठी चित्रपटात झळकणारा शरद प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो.

कियाराने तिची भूमिका जरी चांगली साकारली असली तरी अक्षयसोबत तिची जोडी जमत नाही. चित्रपटात अक्षय कुमारचं वय जास्त असल्याचं सहज दिसून येतं आणि त्या तुलनेत कियारा खूपच तरुण वाटते. चित्रपटात कियाराच्या वाट्याला फार काही आलं नाही. ‘बम भोले’ हे गाणं सोडलं तर इतर गाणी ही उगाचच चित्रपटात दाखवण्यात आल्याची भावना मनात येते. तर सहाय्यक कलाकार म्हणून अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा, आयशा रझा आणि मनु ऋषी यांनी उत्तम काम केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकसत्ता ऑनलाइन’कडून या चित्रपटाला दोन स्टार