बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटात एका वेगळ्याच भुमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मासिक पाळीमध्ये महिलांच्या शारिरीक स्वच्छतेची जाणीव ठेवत अरुणाचलम मुरुगानंथम यांनी स्वस्त दरातील सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती केलेली. त्यांच्याच जीवनावर आधारित हा चित्रपट असून अक्षय कुमार अरुणाचलम यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना करत आहे. मात्र, ‘पॅडमॅन’च्या भुमिकेसाठी ट्विंकलला अक्षय नको होता, हे तिने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केले.

‘मुख्य भुमिकेसाठी अक्षय पहिली पसंती नव्हताच. दिग्दर्शक आर. बाल्की यांनी मला समजावलं की अक्षयच ही भूमिका उत्तमरित्या साकारू शकेल,’ असं ट्विंकल म्हणाली. अक्षय नाही तर दुसरा कोणता अभिनेता तुझ्यामते ही भूमिका साकारू शकला असता, असा प्रश्न तिला पुढे विचारण्यात आला. त्यावर प्रतिप्रश्न विचारत ‘माझ्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला समस्या निर्माण करायची आहे का?(हसते),’ असं तिने गमतीत म्हटलं. इतर काही अभिनेत्यांचा तिने या भुमिकेसाठी विचार केला होता, मात्र बाल्की यांच्या सांगण्यावरून तिने अक्षयच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचंही ट्विंकलने यावेळी स्पष्ट केलं.

वाचा : या पाच कारणांसाठी पाहावा सलमानचा ‘टायगर जिंदा है’ 

अक्षयसोबतच राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.